लोहा  (प्रतिनिधी संतोष चमकुरे)

 पोटावर आला पाय तरीही, मुस्लिम समाजाने शहराच्या सौंदर्यात वाढवली भर
“पोटाची खळगी महत्त्वाची… पण शहराचं भवितव्य त्याहून मोठं”
लोह्यात विकासासाठी मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक त्याग; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

 शहराच्या विकासासाठी एक भावनिक, अभिमानास्पद आणि इतिहासात नोंद होईल असा निर्णय शहरातील काही मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. स्वतःची उपजीविका हातावर पोट असताना, पिढ्यानपिढ्या चालत आलेली घरे, दुकाने आणि मालकीची जागा शहराच्या मुख्य रस्त्यासाठी स्वखुशीने देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकीचे मोठे उदाहरण घालून दिले आहे.

शहरातील महिलांचा मुख्य बाजार, भाजी मंडई ते सय्यद साब जलाल साहब कासार मणियार यांचे घर जामा मस्जिद पर्यंत परिसर हा लोह्याचा अत्यंत वर्दळीचा भाग. याच मार्गाने जुन्या लोह्याकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि बाजारातील गर्दी यामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन नगराध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. “जिथे रस्ता अरुंद आहे, तिथे थोडी जागा द्या; भविष्यात नगरपरिषद तुमच्या सहकार्याची परतफेड करेल,” या शब्दांवर विश्वास ठेवत अनेक मुस्लिम कुटुंबांनी कोणतेही अर्ज, करार किंवा कागदपत्रांची अट न घालता स्वतःची जागा रस्त्यासाठी दिली.

यामध्ये जलालसाब फकीर साहब यांच्या नावावरील भूमी अभिलेख नोंदणी क्रमांक मालमत्ता क्रमांक ८१५ व ८१७ मधील भूखंडाचा काही भाग रस्त्यासाठी देण्यात आला. त्याचबरोबर तांबोळी कुटुंबीय, शेख मेहबूब पटवेघर तसेच भातलवंडे व कवटीकवार कुटुंबीयांचीही रस्त्यालगतची जागा घेण्यात आली.

सोमवार दिनांक २५ मे रोजी जेसीबीच्या साहाय्याने संबंधित घरे, दुकाने व इमारती हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्वतःच्या हातावर पोट असताना, फुटपाथवर आणि आठवडी बाजारात व्यापार करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबांनी शहराच्या विकासासाठी घेतलेला हा त्याग अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्या, काहींच्या दुकानांचे अस्तित्व संपले; पण “शहर मोठं व्हावं” ही भावना त्यांनी जपली.

या वेळी जागा देणाऱ्या धारकांनी एकच अपेक्षा व्यक्त केली आमदार चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात होणारे काम व नगराध्यक्ष शरद पवार यांचा शब्द — “नगरपरिषद प्रशासनाने आमच्या त्यागाची नोंद ठेवावी आणि भविष्यात आम्हाला न्याय द्यावा.”

नगराध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, शहराच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, याच रस्त्यावरील बोडके यांच्या दुकानासमोरील खोडवे यांच्या दुकानासमोरील संनपुरकर बोरगावकर,पटवे,नगरेश्वर मंदिर समोर गुंडावार, गिरीराज सुपर मार्केट पर्यंत अरुंद रस्ता आहेअंकुलवार यांच्या दुकानापासून ते वाले यांच्या घरापर्यंत रस्त्याची अशी समस्या आहे या रस्त्यावरील सर्व धारकांनी आपली जागा रस्त्यासाठी द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे

मुख्य रस्ते रुंद करण्यासाठी सहकार्य करावे आणि लोहा शहराच्या सौंदर्यात भर घालावी.आज लोहा शहरात फक्त रस्ता रुंद झाला नाही…तर माणुसकी, सामाजिक ऐक्य आणि शहरप्रेमही अधिक विशाल झाले आहे.आज लोहा शहरात फक्त रस्ता रुंद होत नाही…तर माणुसकी, विश्वास आणि सामाजिक ऐक्याची वाटही अधिक रुंद होत आहे.जनतेतून समाधान व्यक्त होत आहे