Ticker

6/recent/ticker-posts

जनतेच्या तक्रारींवर थेट पाठपुरावा! जनता दरबारात प्राप्त प्रत्येक समस्या तातडीने सोडवा, प्रशासनाला कडक निर्देश: आ. श्वेता ताई महाले.



मन्सूर शहा. धोत्रा. भ. चिखली.:----

जनता दरबार' उपक्रमात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी तहसील कार्यालय, चिखली येथे अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. जनतेच्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यावर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

✴️ पहिल्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद:

चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी दरमहा पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय, चिखली येथे 'जनता दरबार' हा उपक्रम मी सुरू केला आहे. मे महिन्यात झालेल्या पहिल्या जनता दरबारात मतदारसंघातील विविध भागांतून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध घटकांच्या जमीन, पाणी, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ तसेच महसूल विभागाशी संबंधित जवळपास २५० तक्रारी प्राप्त झाल्या.

✴️ तक्रारींचा सविस्तर आढावा:

या सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी आयोजित आढावा बैठकीत प्रत्येक प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या तक्रारी निकाली निघाल्या, कोणत्या प्रलंबित आहेत, त्यामागील कारणे काय आहेत आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

✴️ 1 जूनपूर्वी तक्रारींचा निपटारा करा:

या वेळी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा दुसरा जनता दरबार होण्यापूर्वी म्हणजेच १ जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावा. एकही तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही बजावले. तक्रारींच्या निपटाऱ्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

✴️ दुसरा जनता दरबार 1 जूनला:

१ जून २०२६ रोजी तहसील कार्यालय, चिखली येथे दुसरा 'जनता दरबार' होणार आहे. मतदारसंघातील ज्या नागरिकांच्या शासकीय तक्रारी, अडचणी किंवा समस्या प्रलंबित आहेत, त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहनही या वेळी केले.

जनतेच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत असून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचा हा माझा प्रयत्न आहे.