Ticker

6/recent/ticker-posts

भेंडा बु // येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी जयंती उत्साहात साजरी



अहिल्यादेवींच्या न्यायनिवाड्यांचे कायद्यात रूपांतर – इतिहास अभ्यासक रामभाऊ लोंढे यांचे प्रतिपादन

भेंडा (वार्ताहर): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भेंडा ग्रामस्थांच्या वतीने बसस्थानक चौकात अभिवादन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक रामभाऊ लोंढे (जालना) यांनी मार्गदर्शन करताना अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायनिष्ठ, लोककल्याणकारी आणि दूरदर्शी कारभाराचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

आपल्या व्याख्यानात लोंढे म्हणाले की, प्रशासन सुरळीत चालविण्यासाठी अहिल्यादेवींनी १५ कलमांचे स्वतंत्र संविधान तयार केले होते. या संविधानात राज्यकारभार कसा असावा, कोणते कार्य करावे व कोणते टाळावे याबाबत स्पष्ट नियमावली होती. अहिल्यादेवींनी दिलेल्या न्यायनिवाड्यांचे पुढे कायद्यात रूपांतर झाले आणि त्यांच्या निर्णयांचा प्रभाव आजही प्रशासन व्यवस्थेत जाणवतो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश महाराज कादे होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉक्टर संतोष फुलारी, किशोर मिसाळ, डॉ. बाळासाहेब कोल्हे, शिवाजीराव तागड, साहेबराव महाराज गव्हाणे, सिद्धार्थ नवले, वैभव नवले, यशवंत सोनवणे, बापूसाहेब नजन, संदीप फुलारी, बबसाहेब भागवत, रूषीकेष तागड, नानासाहेब तागड, अण्णासाहेब गव्हाणे, अर्जुन देशमुख, काशिनाथ काळे, वेदांत काळे, श्रीराम देशमुख, महेंद्र नजन, किसन यादव, वामन औटी, संभाजी सोनवणे, डॉ. लहानु मिसाळ, अरविंद सपकाळ, सचिन तागड, देवेंद्र काळे,महेश रहाटाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्यानापूर्वी संत नागेबाबा मंदिर ते बसस्थानक चौकापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

लोंढे पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२५ रोजी चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. हा नगर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. अहिल्यादेवींनी नगर जिल्ह्याला ऐतिहासिक ओळख मिळवून दिली असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. समाजहितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पंडित यांनी केले. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.