Ticker

6/recent/ticker-posts

सिमेंट कंपनीतील वाद थेट रस्त्यावर.


पाटसमध्ये गावठी कट्ट्यातून गोळीबार, ९ जण जेरबंद

पाटस प्रतिनिधीःगणेश गावडे 

पाटस/दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे झालेल्या एका जुन्या वादातून दोन गटात गोळीबार आणि लाठ्या-काठ्यांनी जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाटस पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सुमारे १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही बाजूकडील ९ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे.

पहिली फिर्याद : सिमेंट गाडी भरण्याच्या वादातून गोळीबार

याप्रकरणी पहिली फिर्याद संतोष बाळकृष्ण कडू (वय ४१ वर्षे, व्यवसाय- ट्रक चालक, रा. बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिली आहे. त्यानुसार, श्री सिमेंट कंपनी पाटस येथे सिमेंट गाडी भरण्याच्या कारणावरून संतोष कडू आणि आरोपी सूरज कुऱ्हाडकर यांच्यात वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी ५ जून रोजी पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स समोर दोन्ही बाजू चर्चेसाठी बसल्या होत्या.

यावेळी आरोपी सूरज कुऱ्हाडकर याने आपले साथीदार अजय धोत्रे आणि अनिल चव्हाण यांना बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी संतोष कडू यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपी अजय धोत्रे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळीबार केला असल्याचे कडू यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सुरज राजेंद्र कु-हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण (सर्व रा. अंबिकानगर पाटस, ता. दौंड) आणि इतर ३ अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद : लोखंडी गजाने आणि दगडांनी मारहाण याच घटनेबाबत दुसरी परस्परविरोधी फिर्याद सूरज राजेंद्र कु-हाडकर (वय ३२ वर्षे, व्यवसाय- ट्रक चालक, रा. अंबिकानगर, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. ०५/०६/२०२६ रोजी दुपारी ०२:२५ च्या सुमारास पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स समोर जुना वाद मिटवण्यासाठी बसले असता, दुसऱ्या गटातील आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला.

आरोपींनी लोखंडी गजाने व दगडांनी फिर्यादी सूरज कुऱ्हाडकर व त्यांच्या साक्षीदाराला डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले, तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या फिर्यादीवरून संतोष बाळकृष्ण कडु (रा. बेटवाडी, ता. दौंड), आण्णा बाबु गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर आण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व इतर ४ ते ५ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करीत आहेत.