नांदगाव खंडेश्वर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाला सफाई व जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांची आरोग्य व स्वच्छता सभापती ज्योत्सना धवसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांची झाडाझडती घेऊन प्रशासनाला सूचना दिल्यात.
शहरातील प्रमुख नाले, गटारी व जलनिस्सारण मार्गाची प्रत्यक्ष पाणी करत कामांच्या गुणवत्तेचा आढावा सभापतींनी घेतला. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रत्येक नाला व गटा पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी सूचना पाहणी दरम्यान आरोग्य सभापतींनी प्रशासनाला दिल्यात. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर, आरोग्य स्वच्छता निरीक्षक पी. एन. सोनटक्के, तसेच सुपरवायझर प्रतीक शिरसाट उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासन अधिक गतिमान झाले असून शहरातील स्वच्छता कामांना वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व प्रभागांतील नालेसफाईची कामे पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





Social Plugin