बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ते फलटण रस्त्यावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा)असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून,
याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक ०५/०६/२०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास मृत महेंद्र माने हे आपल्या पॅशन प्रो मोटरसायकलवरून (क्रमांक MH 11 BM 6476) पुसेगाव-फलटण रस्त्याने डिस्कळच्या दिशेने येत होते. मौजे डिस्कळ गावच्या हद्दीतील गावओढ्याजवळ, जयंत गोडसे यांच्या चिक्कूच्या बागेसमोरील पुलावर आले असता, मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपले वाहन हलगर्जीपणाने व भरधाव वेगात चालवून महेंद्र यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, महेंद्र माने हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर मानवता दाखवून पोलिसांना माहिती देण्याऐवजी किंवा जखमीला मदत करण्याऐवजी अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला.
या संदर्भात मृत महेंद्र यांचे चुलते अविनाश सिताराम माने (वय ७३ वर्षे, व्यवसाय-शेती, रा. डिस्कळ) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५(B), ३२४ (४) आणि मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), १८४ अन्वये गुन्हा (रजि. नं. १३३/२०२६) दाखल केला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री. एन. जे. खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक (पोउनि) श्री. शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास तपास करत असून फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत.





Social Plugin