प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
रावे कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न
आधुनिक शेतीमध्ये उत्पादनवाढीसोबतच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महाविद्यालयाच्या रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत बाळसमुद्र गावात विवेकानंद ॲग्रिकल्चर कॉलेज हिवरा आश्रम येथील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला मृदा नमुना संकलन व मार्गदर्शन उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले. अनेक शेतकरी केवळ पारंपरिक अनुभवाच्या आधारे खतांचा वापर करतात. परिणामी जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते व पीक उत्पादनावर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, तो तपासणीसाठी कसा तयार करावा आणि प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया काय असते याची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी ‘व्ही’ आकारात माती काढण्याची पद्धत, नमुना घेण्याची खोली, नमुन्यातील अशुद्ध पदार्थ वेगळे करण्याची प्रक्रिया तसेच नमुना सुकवून स्वच्छ पिशवीत भरण्याची योग्य पद्धत शेतकऱ्यांना दाखवून दिली. माती परीक्षणाद्वारे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजते आणि त्यानुसार खतांचे नियोजन करता येते, असे त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापनाची जाणीव झाली. रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे यासाठी मृदा परीक्षण आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. माती आरोग्य पत्रिकेचा उपयोग करून शेतकरी अधिक शास्त्रीय पद्धतीने शेती करू शकतात, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
रावे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष शेती परिस्थितीचा अनुभव देणे हा आहे. मात्र अशा उपक्रमांमुळे शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होऊन शेतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. गावातील शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
आजच्या बदलत्या शेती व्यवस्थेत माती परीक्षण ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून शाश्वत शेतीचा पाया आहे. कृषी विभाग, कृषी महाविद्यालये आणि शेतकरी यांनी संयुक्तपणे अशा उपक्रमांना चालना दिल्यास भविष्यात जमिनीचे आरोग्य सुधारण्यास आणि शेती अधिक फायदेशीर बनविण्यास निश्चितच मदत होणार आहे.
हा स्तुत्य उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष कालवे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यासोबतच विस्तार शिक्षण विभागाचे एम. व्ही. खोडके सर, कृषीविद्या विभागाचे एस. एम. जाधव सर आणि मृदा विज्ञान विभागाचे ए. जी. इरतकर सर यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या 'रावे' कार्यक्रमात कृषीदूत विशाल आंधळे, गोपाल भुतेकर, प्रशांत गायकवाड आणि नरेश राठोड या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाविषयी यशस्वीरीत्या जनजागृती केली.





Social Plugin