Ticker

6/recent/ticker-posts

खातगुण-कटगुणच्या सुपुत्राने दक्षिण आफ्रिकेत फडकावला तिरंगा!





जगातील सर्वात खडतर 'कॉम्रेड्स मॅरेथॉन' संजय काळुखे यांनी केली यशस्वीरित्या पूर्ण

बुध   दि . (प्रकाश राजेघाटगे )

शब्दांना सत्याची धार आणि ध्येयाला कष्टाची जोड असेल, तर आभाळही ठेंगणे होते, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जगातील सर्वात जुनी, अत्यंत खडतर आणि मानवी सहनशक्तीचा अंत पाहणारी दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय 'कॉम्रेड्स मॅरेथॉन २०२६ यशस्वीरित्या पूर्ण करून कल्याणसह सातारा जिल्ह्याच्या मातीचा सुपुत्र जागतिक स्तरावर चमकला आहे. कटगुण (ता. खटाव) गावचे रहिवासी आणि खातगुण येथील वेदावती हायस्कूलचे माजी विद्यार्थी संजय आर. काळुखे यांनी या जागतिक महासंग्रामात भारताचे प्रतिनिधित्व करत तिरंगा अभिमानाने फडकावलाआहे.

विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीच्या जोरावर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश आणि त्यांना त्यांचे परममित्र, खातगुण सोसायटीचे माजी चेअरमन तथा कांदा-बटाट्याचे प्रसिद्ध होलसेल व्यापारी विजय लावंड यांचे मित्रत्व, यांना व ग्रामस्थांना आज आनंदाने आभाळही ठेंगणे पडत होते.

'हार मानू नका' थीम करत ९० किमीचा थरार यशस्वी!

यंदाची ही प्रतिष्ठित ९९ वी कॉम्रेड्स मॅरेथॉन 'अप रन' (Up Run) स्वरूपाची होती. यामध्ये धावपटूंना डर्बन ते पिटरमारित्झबर्ग दरम्यान सुमारे *९० किमी अंतराची डोंगर-दऱ्यांची अत्यंत कठीण शर्यत पूर्ण करावी लागली. या संपूर्ण मार्गावर तब्बल १८०० मीटर उंचीची चढण होती. दक्षिण आफ्रिकन संस्कृतीतील 'स्का फेला मोया' म्हणजेच "Don't Give Up" (हार मानू नका!)ही यावर्षीची थीम होती. संजय काळुखे यांनी या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत सर्व अडचणींवर मात करून ही शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली.

कल्याणचे तीन 'रुद्र'; डॉ. शहादपुरी, डॉ. बाभळे आणि संजय काळुखे या जागतिक आव्हानासाठी संजय काळुखे यांच्यासोबत कल्याणचे *डॉ. सोमनाथ बाभळे* आणि *डॉ. हरीश शहादपुरी* हे दोन खंदे शिलेदार मैदानात उतरले होते. या स्पर्धेत पात्रता मिळवणे हेच मुळात एका युद्धापेक्षा कमी नसते, कारण पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) अवघ्या ५ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्या जागतिक धावपटूंनाच यात प्रवेश मिळतो. यंदा जगभरातील २२ हजार जागा अवघ्या १० तासांत फुल्ल झाल्या होत्या.

कल्याणचे डॉ. हरीश शहादपुरी यांनी चौथ्यांदा, तर डॉ. सोमनाथ बाभळे आणि साताऱ्याच्या मातीचे सुपुत्र संजय काळुखे यांनी *तिसऱ्यांदा* या अत्यंत कठीण अशा जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला आहे. हे तिघेही 'रनहोलिक्स' ग्रुपअंतर्गत डॉ. योगेश सातव यांच्या कडक मार्गदर्शनाखाली अनेक महिन्यांपासून कठोर सराव करत होते.

 संजय काळुखे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती कमालीची हलाखीची असताना, त्यांनी खातगुण येथील वेदावती विद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. वेदावती हायस्कूलच्या संपूर्ण बॅचसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. खातगुणचे खंबीर नेतृत्व आणि त्यांचे जिवलग मित्र विजय लावंड व त्यांचे सहकारी मित्रासह आनंदोत्सव साजरा केला. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने अद्वितीय कामगिरी करत संजय काळुखे यांनी आपल्या मूळ सातारा जिल्ह्यासह कल्याणचे नावही जागतिक नकाशावर सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींकडून आणि खटाव वासियांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.