पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
पालघर : बोईसर येथील थावरपाडा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या वनजमिनीवर बेकायदा बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या मालकीची वनजमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असून वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असतानाही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. उलट, "कारवाई करण्यात येईल" अशी आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण करणे आणि वनजमिनीवरील अतिक्रमणे रोखणे ही वन विभागाची प्रमुख जबाबदारी असताना, थावरपाड्यात सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. वेळेत कारवाई न झाल्यास शासनाची मौल्यवान वनजमीन कायमस्वरूपी गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित बांधकामावर तातडीने बंदी घालून जागेची मोजणी करणे, अतिक्रमणाची पडताळणी करणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच अतिक्रमण वाढण्यापूर्वीच वन विभागाने महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, वनजमिनीवरील अतिक्रमणामुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता असून भविष्यात अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एका अतिक्रमणाच्या घटनेप्रमाणे न पाहता शासनाच्या मालमत्तेच्या संरक्षणाच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनजमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रत्यक्ष पाहणी करावी, अतिक्रमणाची वस्तुस्थिती तपासावी आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून शासनाची वनजमीन वाचवावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.





Social Plugin