प्रतिनिधी :- प्रा डॉ विजय गायकवाड
रिसोड:- दिनांक २६.०६.२०२६ स्थानिक स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ प्रकाश यु हणवते यांच्या नियोजनाखाली राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.एम.एन. गायकवाड यांनी "राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी, समाजसुधारक आणि एक सक्षम राज्यकर्ते होते. शाहू महाराजांनी १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली." असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ. प्रकाश यु हनवते यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ. विजय आर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री किसन जाधव, श्री सदा घाटे आणि श्री पंजाब सुर्वे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin