Ticker

6/recent/ticker-posts

वडूज येथील राज्यस्तरीय परीक्षेत नेर-पुसेगावचा डंका!



*स्वराज चव्हाणने पटकावला कराटेतील सर्वोच्च 'ब्लॅक बेल्ट सेकंड दान'; ओंकार अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा*

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

वडूज येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'शोतोकान वर्ल्ड कराटे फेडरेशन ऑफ इंडिया' (SWKF) आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय कराटे प्रशिक्षण शिबिर आणि ब्लॅक बेल्ट परीक्षेत नेर-पुसेगाव परिसराने मोठी बाजी मारली आहे. येथील 'ओंकार स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकॅडमी'चा धडाडीचा खेळाडू स्वराज गजानन चव्हाण याने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर 'ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन' (Black Belt 2nd Dan) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिसरात क्रीडा क्षेत्रातील एकच खळबळजनक आणि ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

दिनांक २७ आणि २८ मे रोजी वडूज येथे हे कडक प्रशिक्षण आणि परीक्षा शिबिर पार पडले. संपूर्ण राज्यातून आलेल्या शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत स्वराजने आपल्या वेगवान हालचाली, अचूक तंत्र आणि आक्रमक कौशल्याचे प्रदर्शन करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि हे उत्तुंग यश खेचून आणले. स्वराजच्या या यशामागे ग्रँडमास्टर शिहान प्रदीप शिंदे, सेन्साई अनिल निकाळजे, सेन्साई जयवंत गोडसे आणि त्याचे मुख्य मार्गदर्शक व प्रशिक्षक सेन्साई अजित घाटगे यांचे कडक व मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याचे पालक श्री. गजानन चव्हाण यांचे त्याला नेहमीच खंबीर सहकार्य लाभले आहे.

**प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील तरुणाची गरुडझेप:**

ग्रामीण भागात राहून, कोणत्याही अत्याधुनिक सुविधांशिवाय केवळ जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर स्वराजने मारलेली ही गरुडझेप खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशामुळे नेर आणि पुसेगाव परिसराचे नाव संपूर्ण राज्य पातळीवर अभिमानाने उंचावले असून, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

स्वराज चव्हाणच्या या दैदिप्यमान आणि ऐतिहासिक यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. त्याच्या या यशाबद्दल ॲड. विशाल जाधव, संजू नाना चव्हाण, माजी सरपंच रुपेश चव्हाण, शरद चव्हाण, सचिन चव्हाण, रोहन चव्हाण, भिकण भाई मुलानी, ज्येष्ठ पत्रकार निसार शिकलगार, संतोष कुंभार तसेच विघ्नहर्ता रियल इस्टेट या समूहातील महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. व या खेरीज तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.