बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
शब्दांना सत्याची धार आणि ध्येयाला कष्टाची जोड असेल, तर आभाळही ठेंगणे होते, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जगातील सर्वात जुनी, अत्यंत खडतर आणि मानवी सहनशक्तीचा अंत पाहणारी दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय **'कॉम्रेड्स मॅरेथॉन २०२६'** यंदा गाजवण्यासाठी कल्याणसह सातारा जिल्ह्याच्या मातीचा सुपुत्र सज्ज झाला आहे. कटगुण (ता. खटाव) गावचे रहिवासी आणि खातगुण येथील वेदावती विद्यालयाचे माजी विद्यार्थी **संजय काळुखे** हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह या जागतिक महासंग्रामात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल आणि हालाकीच्या परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर घेतलेली झेप आहे. खातगुण सोसायटीचे माजी चेअरमन तथा कांदा-बटाट्याचे प्रसिद्ध होलसेल व्यापारी **विजय लावंड** यांचे परम व घनिष्ठ मित्र आहेत संजय काळुखे यांच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या निवडीची बातमी समजताच विजय लावंड यांचे सह खातगुण परिसरात अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.
**१४ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत थरार; 'हार मानू नका'ची थीम**
आगामी १४ जून २०२६ रोजी या प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉनची ९९ वी आवृत्ती रंगणार आहे. यंदाची स्पर्धा 'अप रन' (Up Run) स्वरूपाची असून, धावपटूंना डर्बन ते पिटरमारित्झबर्ग दरम्यान तब्बल **८५.७७ किलोमीटरचे** डोंगर-दऱ्यांचे अत्यंत कठीण अंतर धावून पूर्ण करावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकन संस्कृतीतील 'स्का फेला मोया' म्हणजेच **'हार मानू नका!'** ही यंदाची थीम असून, संजय साळुंखे आणि त्यांचे सहकारी ही थीम मैदानावर खरी करून दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
**कल्याणचे तीन 'रुद्र'; डॉ. शहादपुरी, डॉ. बाभळे आणि संजय साळुंखे**
या जागतिक आव्हानासाठी संजय साळुंखे यांच्यासोबत कल्याणचे **डॉ. सोमनाथ बाभळे** आणि **डॉ. हरीश शहादपुरी** हे दोन खंदे शिलेदार मैदानात उतरत आहेत. या स्पर्धेत पात्रता मिळवणे हेच मुळात एका युद्धापेक्षा कमी नाही. पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) अवघ्या ५ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्या जागतिक धावपटूंनाच यात प्रवेश मिळतो. यंदा जगभरातील २२ हजार जागा अवघ्या १० तासांत फुल्ल झाल्या होत्या, यावरून या शर्यतीची क्रेझ स्पष्ट होते.
कल्याणचे डॉ. हरीश शहादपुरी हे चौथ्यांदा, तर डॉ. सोमनाथ बाभळे आणि साताऱ्याच्या मातीचे सुपुत्र संजय साळुंखे हे तिसऱ्यांदा या अत्यंत कठीण अशा जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवणार आहेत. हे तिघेही 'रनहोलिक्स' ग्रुपअंतर्गत डॉ. योगेश सातव यांच्या कडक मार्गदर्शनाखाली अनेक महिन्यांपासून रक्ताचे पाणी करून कठोर सराव करत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कामगिरी करत संजय साळुंखे यांनी आपल्या मूळ सातारा जिल्ह्यासह कल्याणचे नावही जागतिक नकाशावर कोरले आहे. १४ जूनच्या या महाशर्यतीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींचे डोळे लागले असून, या त्रिकुटावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





Social Plugin