हाता (प्रतिनिधी) – राजेश दामोदर : दि .. ६ / ६ / २६
गावातील सार्वजनिक मालमत्ता म्हणून ओळखली जाणारी आठवडी बाजाराची जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, काही गावकऱ्यांनी या जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागेवर हळूहळू वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली आठवडी बाजाराची जागा काही व्यक्तींनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे बाजार भरविण्यासाठी उपलब्ध जागा कमी होत असून, व्यापाऱ्यांना व ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, हे अतिक्रमण प्रशासनाच्या नजरेसमोर होत असतानाही त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित महसूल विभाग याबाबत मौन बाळगून असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ आहे की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना आठवडी बाजाराची जागा वाचविण्यासाठी कोणतीही प्रभावी पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे भविष्यात संपूर्ण जागेवरच अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी तातडीने सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली असून, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.





Social Plugin