पाटस प्रतिनिधीःगणेश गावडे
पुणे/दौंड:मौजे बोरीपार्धी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटीलवस्ती येथे बंदिस्त गटर (ड्रेनेज) कामासाठी निधी मिळावा, या प्रमुख मागणीसाठी पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. बोरीपार्धी येथील नागरिक श्री. प्रदेश ज्ञानदेव शेलार यांनी ८ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुसळधार पावसात हे बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी उपोषणकर्त्यांना या संदर्भातील अधिकृत लेखी उत्तर सुपूर्द केले. या पत्रामध्ये प्रशासनाने सद्यस्थितीतील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी स्पष्ट केल्या आहेत.
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या केवळ दैनंदिन व अत्यंत आवश्यक बाबींवरच खर्च करण्याचे बंधन असल्यामुळे नवीन कामांसाठी निधीची तरतूद तात्काळ करता येत नाही, असे प्रशासनाने यात नमूद केले आहे. तसेच प्रस्तावित गटर लाईन ही खाजगी शेतकर्यांच्या जागेतून जात असल्याने, संबंधित शेतकऱ्यांकडून 'रजिस्टर बक्षीस पत्र' (Gift Deed) ग्रामपंचायतीच्या नावाने करून मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे बक्षीस पत्र प्राप्त होताच आणि शासन स्तरावरून पुढील आदेश मिळताच ग्रामपंचायत स्तरावरून या कामाची तरतूद करून काम मार्गी लावले जाईल, असे प्रशासकीय उत्तर मिळाल्यानंतर आंदोलकांनी सकारात्मक भूमिका घेतली. प्रशासनाने कायदेशीर तांत्रिक बाबींवर स्पष्टपणे बोट ठेवत कामाची पुढील दिशा स्पष्ट केल्यामुळे, श्री. प्रदेश ज्ञानदेव शेलार यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या लेखी खुलाशानंतर आणि सामंजस्यपूर्ण तोडग्यामुळे बोरीपार्धी परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आता गटर लाईनच्या पुढील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोरीपार्धीचे आंदोलन खरंच यशस्वी की केवळ प्रशासकीय मलमपट्टी? जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर उपोषण मागे!





Social Plugin