

प्रतिनिधी आकाश रुमणे नांदगाव खंडेश्वर दि. ,१५
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे व कमी उगवणक्षमतेचे बोगस बियाणे विक्री करण्यात आल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात धडक दिली. नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देत संबंधित बियाणे उत्पादक कंपनीवर सात दिवसांच्या आत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खरेदी केलेल्या बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च भरपाई म्हणून द्यावा. अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभमिळत नाही. त्यातच वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असून, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे त्याची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांवर भारतीय न्याय संहिता तसेच बियाणे अधिनियम, १९६६ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्राप्ती मारोटकर, बाबासाहेब राणे, प्रमोद कोहळे, ओंकार ठाकरे, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, प्रीती इखार, प्रशांत काळे, सुनील गुरमुळे, गुणवंत चांदुरकर, मधुकर कोठाळे, निलेश इखार, रवी ठाकूर, अक्षय राणे, सूरज लोमटे, पंकज पिंपळकर, प्रकाश ब्राह्मणवाडे, जयश्री सुहागपूरे, भावेश भांबूरकर, सुमित लोमटे, शुभम रावेकर यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




Social Plugin