Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाइफ ट्रस्टतर्फे भाटेपुरी येथे १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप





कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

दि. १६ जुलै २०२६

जालना : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी भाटेपुरी सेंटरअंतर्गत १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भाटेपुरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, खनेपुरीचे संचालक अॅड. नितीनभैया माळशिखरे उपस्थित होते. तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. आटोळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी श्री. जोमा मस्ती होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. त्यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करण्याचा संदेश दिला.

या शैक्षणिक वर्षात ट्रस्टच्या माध्यमातून १०० विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, आलेख पुस्तक तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

मार्गदर्शन करताना मान्यवरांनी, "शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे," असे प्रतिपादन केले.

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था २००८ पासून जालना जिल्ह्यातील मंठा, वाटूर, जालना, बदनापूर आणि भाटेपुरी या भागांत विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्प राबवत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमही संस्थेमार्फत राबविले जातात. संस्थेच्या संस्थापिका डॉ. विल्ली डॉक्टर आहेत.

या कार्यक्रमास लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे एसएफएसईपी प्रकल्पाचे जालना विभाग समन्वयक सुबोध खंदारे, केंद्र कार्यकारी कैलास कोल्हे, शिवाजी काजळकर तसेच नवनाथ कावळे, दीपक बोंद्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले.