बुध दि . [प्रतिनिधी ] :
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा येथे व्यावसायिक अर्थशास्त्र, बँक मॅनेजमेंट व बिझनेस अनॅलिटिक्स विभागाच्या वतीने 'जागतिक लोकसंख्या दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे होते, तर ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. डॉ. एल. एन. घाटगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विभागप्रमुख प्रो. (डॉ.) विजय कुंभार यांनी प्रास्ताविक करत जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी "देशाची खरी संपत्ती ही कार्यक्षम व उत्पादक लोकसंख्या आहे," असे प्रतिपादन करत लोकसंख्येचे योग्य नियोजन, कौशल्यविकास आणि मानवी संसाधनांचा प्रभावी वापर ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. एल. एन. घाटगे यांनी लोकसंख्येची सद्यःस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक व आर्थिक समस्यांचे गांभीर्य तसेच वाढती लोकसंख्या आणि शाश्वत विकास यांतील परस्परसंबंध या विषयांचे सखोल विश्लेषण केले. लोकसंख्या वाढीचा विकास प्रक्रियेवर होणारा परिणाम आणि संतुलित लोकसंख्या व्यवस्थापनाची आवश्यकता त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे आभार डॉ. विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. राजशेखर निलोलू तसेच व्यावसायिक अर्थशास्त्र, बँक मॅनेजमेंट व बिझनेस अनॅलिटिक्स विभागातील सर्व प्राध्यापकांनी केले.





Social Plugin