Ticker

6/recent/ticker-posts

'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे : स्नेहल जाधव



 बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

सध्या पर्यावरण हे धोक्यात आले असून, पर्यावरणाचा परिणाम दैनंदिन जीवनावर लोकांच्या आरोग्यावर पडत असून, निरोगी आरोग्यासाठी व पर्यावरणातील ऑक्सिजन वाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य स्नेहल जाधव यांनी केले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवानीनगर, पुसेगाव ता. खटाव जि. सातारा येथे 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' या पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या पर्यावरण संतुलनसाठी, वृक्ष लागवडीची गरज असून, केवळ वृक्ष लागवड न करता त्याची जोपासना व उत्तम प्रकारे जतन करणे ही आजच्या विद्यार्थ्यांच्यासह सर्वांची जबाबदारी असल्याचे  मार्गदर्शन करत वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व विशद केले. प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी

स्वीकारली, तर पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी होईल, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनीही वाटप करण्यात आलेल्या वृक्षरोपांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास वर्धनगडचे केंद्रप्रमुख नवनाथ गावडे, तानाजी साळुंखे, समीर जाधव, सागर चव्हाण, प्रीती कांबळे, दिपाली जाधव, नलिनी मसने, शिल्पा देवकर, पूजा जाधव, वंदना गायकवाड, पूजा तारळकर इत्यादी बहुसंख्यपालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी गोरे यांनी केले. सरवदे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले, तर सुभाष नाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका जाधव, फडतरे, काकडे, आणि सूर्यवंशी  यांनी विशेष परिश्रम घेतले.