नांदगाव खंडेश्वर, प्रतिनिधी : गौरव ब्राम्हणवाडे
महानायक बिरसा मुंडा आदिवासी दिवसानिमित्त इकोनेट संस्था, पुणे यांच्या माध्यमातून समुदाय केंद्र मॉडेल (CCM) अंतर्गत नांदगाव खंडेश्वर शहरातील प्रभाग क्रमांक २, ओंकारखेडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे तसेच डॉ. भूषण पोतदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महानायक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष, सामाजिक योगदान तसेच आदिवासी दिवसाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
महानायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्क, स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी केलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांची आठवण केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती सामाजिक कृतीतून पुढे नेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर समाजाचा विकास आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असून, पुढील पिढीसाठी निसर्ग जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला पारधी समाजातील महिला, पुरुष तसेच मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, हक्क आणि सामाजिक विकास याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी शिवा पवार, अल्केश भोसले, सतीश पवार, राजन पवार, अभय पवार, नकाशे भोसले, सुरज पवार, राजेश पवार, सौ. शेवटीन भोसले, आरती भोसले, रेणुका पवार, निपेशा पवार आदी उपस्थित होते.
महानायक बिरसा मुंडा यांच्या विचारांचा प्रसार, आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये हक्क व कर्तव्यांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम सामाजिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.





Social Plugin