नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; स्वच्छतेकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप
नांदगाव खंडेश्वर | प्रतिनिधी : गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरातील प्रभाग क्रमांक १४, गवारीपुरा परिसरात सध्या अस्वच्छतेचे गंभीर चित्र निर्माण झाले असून, ठिकठिकाणी साचलेली घाण, चिखल आणि मोकाट डुकरांचा वाढता वावर यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील रस्त्यालगत घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात चिखल व साचलेल्या घाणीमुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. त्यातच मोकाट डुकरांचा संपूर्ण परिसरात वावर असल्याने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अस्वच्छ वातावरणामुळे आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असतानाही या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक दिवसांपासून समस्या कायम असूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?" असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गवारीपुरा परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने परिसराची स्वच्छता करावी, नियमित कचरा संकलन करावे, मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा तसेच पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





Social Plugin