Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावात बेशिस्त वाहनचालकांना दणका



पोलिसांकडून ६७ कारवाया; ५४ हजारांचा दंड वसूल, प्रेशर हॉर्न, सायलेन्सर जप्त


बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष नाकाबंदी मोहीम राबवून ६७ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यात संबंधितांकडून ५४ हजार रुपये दंड वसूल केला, तसेच कर्णकर्कश सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नही जप्त केले.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुसेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेख, पोलिस उपनिरीक्षक पुजारी, वाहतूक पोलिस अंमलदार संतोष बागल, पोलिस अंमलदार बापूराव नवत्रे, राहुल जाधव व अविनाश घाडगे यांच्या पथकाने  विसापूर फाटा व छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसेगाव येथे विशेष नाकाबंदी केली.

या मोहिमेत बेशिस्त वाहनचालक, तसेच कॉलेज व एसटी स्टँड परिसरातील रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार एकूण ६७ केसेस दाखल

करून ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या सहा वाहनांवर आणि प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या सात वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले. पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेज परिसरात यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे नागनाथ खुणे यांनी सांगितले.

कारवाईत सातत्य हवे

बेशिस्त वाहनचालकांवर केलेल्या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. त्याचबरोबर अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुसेगावसह खटाव, विसापूर, निढळ, बुध, डिस्कळ आणि इतर गावांमध्ये शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमियो विनाकारण घिरट्या घालतात. बुधमधील रहदारीच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवायांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे.