देवस्थानसह पुसेगावच्या विकासाला नेहमीच प्राधान्य
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्था उभ्या करण्यात अनेक पुसेगावकरांचा वाटा आहे. हजारो विद्यार्थी शिक्षण घेणाऱ्या येथील संस्था विस्तारित झाल्या आहेत. या संस्थांमधून असंख्य यशस्वी विद्यार्थी घडले आहेत. या संस्थेच्या आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टसह परिसराच्या विकासासाठी यापूर्वीही नेहमी सहकार्य करत आलो आहे. यापुढेही लागेल ते सहकार्य करु अशी ग्वाही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिली.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व श्री हनुमानगिरी हायस्कूल येथील नवीन आर.सी.सी. इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्री. गोरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती लता कर्णे, खटाव पंचायत समितीच्या उपसभापती रेश्मा शेडगे ,संस्था अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सचिव मोहनराव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत, ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले, ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने विकासात्मक कामे होत आहेत. यात्रा स्थळाची जागा श्री सेवागिरी देवस्थानला देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे काम मंत्री गोरे पाठपुरावा करून लवकरच मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आ. धैर्यशील कदम यांनीही संस्थेला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविकात डॉ. सुरेश जाधव यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेऊन शैक्षणिक संकुल परिसरातील विकासकामे पूर्ण करण्याची मागणी केली. सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी मानले.
शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी .....
शाळांमध्ये देशाचे उद्याचे भविष्य घडत आहे. राज्यातील सर्वच शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर आम्ही भर देत आहोत. सातारा जिल्ह्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आम्ही २५ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. श्री सेवागिरी देवस्थानला ५ कोटींचा निधी दिला आहे. आणखी १० कोटींचा निधी देणार आहे. देवस्थान ट्रस्टची यात्रा स्थाळावरील जमीन लवकरच परत मिळवून देवू . - ना. जयकुमार गोरे , ग्रामविकास मंत्री





Social Plugin