३० गुंठ्यांत ५२.५० गाड्या आले विसापूरच्या शेतकऱ्याचा विक्रमी प्रयोग जलक्रांतीमुळे शेतीला मिळाली नवी दिशा
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर ता. खटाव येथील तरुण शेतकरी रामदास पोपट शिंदे यांनी आधुनिक शेती, पाण्याचे योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. अवघ्या ३० गुंठे क्षेत्रात सुमारे सव्वा वर्षात तब्बल ५२.५० गाड्या आलेचे उत्पादन घेऊन त्यांना ३३ लाख ६० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. उत्पादन खर्च वजा केल्यानंतरही त्यांना ३० लाखांहून अधिक रक्कम निव्वळ मिळाल्याने हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विसापूर डोंगर पायथ्यालगत वसले असून, या परिसरात पर्जन्यमान चांगले आहे. सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच सागर साळुंखे आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे जलसंधारणाची प्रभावी कामे केली. ओढ्यांवर साखळी सिमेंट बंधारे, बाजार तलावाचे नूतनीकरण, डीप सीसीटी तसेच ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण अशा विविध कामांना तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अवघ्या नऊ महिन्यांत झालेल्या या कामांमुळे विसापूर परिसरात जलसाठा निर्माण होऊन शेतीला मोठा आधार मिळाला.
आज विसापूर परिसरात आले, ऊस यांसह विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याची दिशा शेतकऱ्यांनी स्वीकारली आहे.
रामदास शिंदे यांनी २० मे २०२५ रोजी आल्याची लागवड केली. ३० गुंठे क्षेत्रात सव्वा वर्ष आल्याची काळजी घेतल्यानंतर यंदा पीक काढणीस आले. एका गुंठ्यात सरासरी १.७५ गाडी उत्पादन मिळाले. त्यानुसार ३० गुंठ्यांत एकूण ५२.५० गाड्या आले निघाले. त्या वेळी आल्याचा बाजारभाव प्रति गाडी ६४ हजार रुपये होता. या दराने एकूण ३३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि इतर खर्च मिळून सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे खर्च वजा करता शेतकऱ्याला सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपयांचा निव्वळ आर्थिक फायदा झाला आहे.
शेतकरी रामदास शिंदेंचे म्हणणे...
“आले पिकासाठी सागर देशमुख, पुसेगाव तसेच कोरेगाव येथील हंकारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य नियोजन, वेळेवर औषध फवारणी, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे काटेकोर नियोजन केले तर आल्यातून चांगले उत्पादन मिळू शकते, याचा अनुभव यंदा आला. ३० गुंठ्यांत भरघोस उत्पादन मिळाल्याने उत्पादन खर्च वजा जाता ३० लाखांपेक्षा अधिक नफा मिळाला आहे. आल्याला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - रामदास शिंदे तरुण शेतकरी, विसापूर.
अश्विन मुदगल यांच्या जलक्रांतीचा परिणामविसापूरमध्ये जलसंधारणाच्या कामांमुळे शेतीचे चित्र बदलले
विसापूर परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा शेतीवर मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने अनेक शेतकरी पारंपरिक शेतीसोबत आलेसारख्या नगदी पिकांकडे वळले आहेत. ठिबक सिंचन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. जलसंधारणातून निर्माण झालेल्या या संधीमुळे विसापूरच्या शेतीला आर्थिक बळ मिळाले असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. या परिवर्तनामागे तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या दूरदृष्टीतून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे विसापूरकर ग्रामस्थ सांगतात.
विसापूर येथे ३० गुंठे क्षेत्रात जोमात आलेले आले पीक. शेतकरी रामदास शिंदे, वडील पोपट शिंदे यांच्यासह मार्गदर्शक सागर देशमुख व अनिल हंकारे, शेतात निघालेले उत्पन्न छाया - प्रकाश राजेघाटगे बुध






Social Plugin