नांदगाव खंडेश्वर, प्रतिनिधी : गौरव ब्राम्हणवाडे
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातील कथित आर्थिक अनियमितता, प्रशासकीय त्रुटी तसेच विविध विकासकामांतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अविनाश ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नगरपंचायतीच्या कारभाराबाबत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. चुकीची आर्थिक बिले काढणे, नगरसेवकांच्या नातेवाईकांना टेंडर देणे, एकाच व्यक्तीच्या नावाने वारंवार टेंडर देणे तसेच ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत हेराफेरी व मॅनेजमेंट केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभागातील कामांसाठी आवश्यक मंजुरी न घेता खर्च करण्यात आल्याचा तसेच निविदा जाहिरातींच्या प्रसिद्धीबाबतही अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सन २०२५ मधील नगरपंचायत निवडणुकीच्या खर्चाची तपासणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत झालेली कामे, विविध विकासकामे, वृक्षारोपणाच्या कामांची बिले तसेच सामान्य फंडातून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नगरपंचायतीतील लेखापाल पदासंदर्भातील कथित गैरप्रकाराचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व्यवस्थेबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नगरसेवकांकडून वारंवार सीसीटीव्ही चित्रीकरणाची मागणी करण्यात आली असतानाही त्यावर योग्य कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अध्यक्षांच्या दालनाच्या सुशोभीकरणाच्या कामाबाबतही निवेदनात आक्षेप नोंदवण्यात आला असून, या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती किंवा नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांचे प्रलंबित मानधन आणि विविध योजनांच्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच आवश्यकता भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांची बदली अथवा निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, नगरविकास मंत्री, नगरविकास विभागाचे अपर सचिव, संबंधित आमदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, निवेदनात करण्यात आलेले आरोप हे चौकशीच्या मागणीच्या स्वरूपात असून, संबंधित प्रकरणांची अधिकृत चौकशी व तथ्य पडताळणी झाल्यानंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.





Social Plugin