Ticker

6/recent/ticker-posts

गायत्री देशमुखचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश



SEBC प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक; क्लास-१ अधिकारी होण्याचे ध्येय

बुध  दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत फडतरवाडी बुध (ता. खटाव) येथील सुकन्या गायत्री अशोक देशमुख हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुद्रांक निरीक्षक/उपनिबंधक (श्रेणी-१) तसेच राज्यकर निरीक्षक (STI), वर्ग-२ या पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत तिची निवड झाली असून, SEBC प्रवर्गातून महाराष्ट्रातील मुलींमध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशामुळे फडतरवाडी बुधसह सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गायत्री देशमुख हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल, सातारा येथे झाले. त्यानंतर तिने विद्या प्रतिष्ठान, बारामती येथून B.Sc. Agri Biotechnology ही पदवी पूर्ण केली. शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करत तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले.

गायत्रीचे वडील सैनिक स्कूल, सातारा येथे नोकरीस असून आई गृहिणी आहे. चार बहिणी व भाऊ असा परिवार असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गायत्रीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळविले आहे. तिच्या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत व सातत्य यांचा मोठा वाटा आहे.

विशेष म्हणजे, गायत्रीने यापूर्वी CDS परीक्षेत पाच वेळा अंतिम यादीपर्यंत मजल मारली; मात्र प्रत्येक वेळी अंतिम निवडीपासून ती थोडक्यात दूर राहिली. वारंवार आलेल्या अपयशाने खचून न जाता तिने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने आपल्या मेहनतीचे फलित मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले.

गायत्रीच्या या यशाबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सातारा अभियंता संघटनेचे अध्यक्ष कृष्णात फडतरे, कृषी अधिकारी धनाजी फडतरे, सरपंच प्रियांका विकास फडतरे ,तसेच सैनिक स्कूल, सातारा येथील शिक्षक, अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या भावी प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

“मिळालेले यश हे अंतिम ध्येय नसून पुढील प्रवासाची सुरुवात आहे,” या भावनेने गायत्रीने स्पर्धा परीक्षेची तयारी अद्यापही सुरू ठेवली आहे. भविष्यात क्लास-१ अधिकारी होण्याचा मानस तिने व्यक्त केला असून, त्यासाठी अधिक जोमाने तयारी करण्याचा तिचा निर्धार आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गायत्रीने सातत्य, जिद्द आणि अपयशानंतरही न खचण्याची वृत्ती याच्या जोरावर मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.