बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
महिलांनी केवळ भौतिक प्रगती किंवा पुरुषांशी बरोबरी करणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य नव्हे, तर स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची वैचारिक परिपक्वता येथे हेच खरे स्त्री स्वातंत्र्य आहे. आजच्या काळात - स्त्री स्वातंत्र्य पूर्णपणे वास्तविकही नाही आणि पूर्णपणे काल्पनिकही नाही; आपण सध्या या स्वातंत्र्याच्या - एका महत्त्वाच्या संक्रमण काळातून जात आहोत, असे परखड प्रतिपादन कवयित्री गुंजन पाटील यांनी केले.
पुसेगाव येथील ऐतिहासिक व नामांकित अंशा श्री सेवागिरी व्याख्यानमालेतील - आजचे चौथे पुष्प 'स्त्री स्वातंत्र्यः - वास्तविक की काल्पनिक' या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या -विषयावर गुंफण्यात आले.
या वैचारिक सोहळ्याला पुसेगाव आणि परिसरातील साहित्यप्रेमी, - सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवा वर्ग सोठ्या संख्येने उपस्थित होता.
व्याख्यान कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी कवयित्री गुंजन पाटील यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवर नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले.
व्याख्यानाच्या प्रारंभी गुंजन पाटील यांनी श्री सेवागिरी देवस्थानच्या पवित्र भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या ठिकाणी येऊन अखंड ऊर्जेचा अनुभव घेता आला याचा मला खूप आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.
गुंजन पाटील म्हणाल्या की, आज वरकरणी पाहता स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. अंतराळापासून ते कॉर्पोरेट जगापर्यंत तिने मारलेली झेप नक्कीच कौतुकास्पद असून, हा स्त्री स्वातंत्र्याचा 'वास्तविक' चेहरा आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालताना तिच्या मनात असणारी भीती, तिच्या चारित्र्यावर सहज उचलले जाणारे प्रश्नचिन्ह आणि आजही घरात किंवा कामाच्या ठिकाणी होणारी तिची घुसमट पाहिली की, हे स्वातंत्र्य केवळ 'काल्पनिक' आहे का, असा प्रश्न पडतो. आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असली, तरी तिचे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अजूनही घरातील पुरुषाकडेच असते, ही मानसिक गुलामगिरी नष्ट होण्याची खरी गरज आहे. आधुनिकतेच्या नावाखाली केवळ पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणे किंवा स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तर खऱ्या स्वातंत्र्याला जबाबदारीची आणि कर्तव्याची जोड असणे आवश्यक आहे. स्त्री स्वातंत्र्याचा
लढा हा पुरुषांच्या विरोधात नसून जुनाट आणि बुरसटलेल्या मानसिकतेच्या विरोधात आहे, त्यामुळे स्त्रीला समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानाच्या उत्तरार्धात गुंजन पाटील यांनी आपल्या काही गाजलेल्या कविता सादर केल्या. त्यांच्या कवितांमधील धारदार शब्दांनी आणि मांडणीने उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन घातले. 'स्त्रीला पंख देण्यापेक्षा, तिच्या उडण्यावरचें निर्बंध उठवा," या त्यांच्या वाक्याला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.
कार्यक्रमास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ सुरेश जाधव , रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, गौरव जाधव, सचिन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले.





Social Plugin