Ticker

6/recent/ticker-posts

आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर; महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक.



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना, मंगरूळ फिडरवर विजेचा लपंडाव; अधिकारी मात्र सुस्तच!

शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसवर ठिय्या देत महावितरणच्या नावाने मारली बोंब एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच दुष्काळसदृश परिस्थितीच्या भयंकर आसमानी संकटाला सामोरा जात असताना, त्यातच महावितरणच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर सुलतानी संकटाची भर पडली आहे. शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना व मंगरूळ फिडरवरील वीजपुरवठ्याचा अक्षरशः पाठशिवणीचा खेळ सुरू असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

पावसाने ओढ दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, ज्या वेळी पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज आहे, त्याच वेळी वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. वीज कधी येते आणि कधी जाते याचा नेम राहिलेला नाही. रात्री-अपरात्री शेतात जाऊन मोटारी सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, अंधारात वीजपुरवठ्याच्या प्रतीक्षेत तासन्‌तास बसण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.

तक्रारी करूनही अधिकारी ढिम्म; शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष

वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या बिघाडाबाबत संबंधित लाईनमन, कनिष्ठ अभियंता (JE) तसेच उपविभागीय अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न हा त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या जीवघेण्या परिस्थितीची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना आहे की नाही, असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

महावितरणच्या कार्यालयात तक्रार केल्यानंतरही प्रश्न सुटत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांना थेट पॉवर हाऊसवर धाव घ्यावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि महावितरणच्या नावाने बोंब मारून आपला संताप व्यक्त केला.

“आम्ही वीज मागतोय, उपकार नाही!”

शेतकरी आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे चिंतेत आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर कोमेजत असताना वीजपुरवठा सुरळीत न मिळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या संकटात भर घालण्यासारखे आहे.

आसमानी संकटाशी शेतकरी लढतोय, पण सुलतानी संकटाने त्याची कंबर मोडली आहे. प्रशासन आणि महावितरणने आता तरी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. संबंधित फिडरवरील वीजपुरवठ्याची तातडीने पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला असून, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विजय परिहार, उद्धव चव्हाण, प्रकाश गवते, शिवा चव्हाण, भगवान परिहार, प्रमेश्वर सुरुशे, सागर परिहार, विष्णु परिहार, लक्ष्मण परिहार, अरुण परिहार, विकास चव्हाण, सुरेश पाटील, लक्ष्मण गावडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही तर नुकसान केवळ शेतकऱ्यांचे होत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे महावितरणने कागदी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.