Ticker

6/recent/ticker-posts

अतिशय गंभीर बाब! पळसवाडी-शेखापुरी शिवारात दोन शेळ्यांचा बिबट्याने घेतला बळी




प्रशासन शांत; शेतकरी व शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पळसवाडी : पळसवाडी व शेखापुरी शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या काही दिवसांच्या अंतरात बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश दत्तात्रय ठेंगडे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी गोरख विश्वनाथ वणे यांच्या शेळीवर पुन्हा बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला.

सलग दोन घटनांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. विशेषतः शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे. घराच्या बाहेर एकट्याने पडणे म्हणजे जणू मृत्यूशी झुंज देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची काळजी घेण्याबरोबरच स्वतःच्या सुरक्षिततेचीही चिंता सतावत आहे. बिबट्याचा वावर नेमका कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती नसल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर पळसवाडी व शेखापुरी ग्रामस्थांनी वनविभाग व प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. भविष्यात बिबट्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

प्रशासन आणखी किती घटनांची वाट पाहणार? असा सवालही आता संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

 खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे