Ticker

6/recent/ticker-posts

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न .

 

सत्य, अहिंसा आणि शास्त्रीजींची मूल्यनिष्ठा आजच्या काळाची गरज : प्रा. डॉ. अनंत आवटी

देऊळगाव राजा: प्रतिनिधी मनोहर खंदारे 

स्थानिक श्री बालाजी संस्थान संचलित श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 'महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसाविषयक विचार' या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एन. एच. शेगोकार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनंत आवटी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविक व अतिथी परिचय कु. गायत्री राऊत हिने करून दिला, तर विद्यार्थिनी कु. रुद्रानी रामपूरकर हिने महापुरुषांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनमूल्यांचा अनुबंध उलगडून दाखवला. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "सत्य आणि अहिंसा ही केवळ राजकीय आंदोलनाची साधने नसून ती आत्मिक बळ देणारी जीवनशैली आहे." त्यांनी बालपणीच्या प्रसंगांचे दाखले देत 'सत्य हेच ईश्वर' ही संकल्पना स्पष्ट केली. तसेच अहिंसेचे वर्गीकरण करताना त्यांनी 'भित्र्यांची अहिंसा', 'दुर्बळांची अहिंसा' आणि 'शूरवीरांची अहिंसा' यातील भेद विशद केले. अन्याय सहन न करता नैतिक अधिष्ठान आणि आंतरिक सामर्थ्याने उभे राहणारी 'शूरवीरांची अहिंसा' हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना डॉ. आवटी म्हणाले, "शास्त्रीजी हे गांधीवादी मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांची निष्कलंक चारित्र्यसंपन्नता, उच्च कोटीची प्रामाणिकता आणि अथांग साधेपणा आजही आदर्शवत आहे. त्यांनी दिलेला 'जय जवान, जय किसान' हा नारा केवळ घोषणा नसून देशाच्या स्वावलंबनाचा आणि स्वाभिमानाचा मूलमंत्र होता." आजच्या तरुणाईने गांधीजींचे सत्य-अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि शास्त्रीजींची कर्तव्यनिष्ठा यांचा मेळ घालून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. एन. एच. शेगोकार यांनी शास्त्रीजींच्या साधेपणावर आणि गांधीजींच्या विचारांच्या सद्यकालीन उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. गांधीजींचे आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग' हे पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असून नव्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव आणि प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामेश्वर माने यांनी केले, तर आभार प्रा. ए. के. राठोड यांनी मानले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यास मंडळ सदस्य व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.