Ticker

6/recent/ticker-posts

पोशेरा परिसरात गांधी जयंतीनिमित्त श्रमदानाचा जागर.



पत्रकार गावित चंद्रकांत ग्रामीण प्रतिनिधी, बोरशेती

पोशेरा, दि. २ ऑक्टोबर २०२६ : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पोशेरा रड्याचापाडा ते कातकरीवाडी परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि बालगोपाळांनी गावाच्या स्वच्छतेसाठी एक दिवस श्रमदान केले. जयंती केवळ अभिवादन करून साजरी न करता प्रत्यक्ष कृतीतून गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना मानवंदना देण्याचा अनोखा उपक्रम यावेळी राबविण्यात आला. हातात झाडू घेऊन महिला आणि युवक रस्त्यावर उतरले, तर बालगोपाळांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. ‘एक दिवस गावासाठी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे परिसरात स्वच्छतेसोबतच सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ झाली.

या उपक्रमाची संकल्पना पोशेरा परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते हेमंत लक्ष्मण शिंगाडे यांनी मांडली. गांधी जयंतीचे औचित्य साधून गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमात श्रमजीवी संघटनेचे युवा नेतृत्व अनिल वाघ, मयूर पागी आणि लक्ष्मण दिवे यांच्यासह महिला मंडळ, युवक, सामाजिक कार्यकर्ते व बालगोपाळ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. गावाच्या विकासासाठी केवळ अपेक्षा व्यक्त करून चालत नाही, तर त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने हातभार लावला पाहिजे, याचा आदर्श या श्रमदानातून घालून देण्यात आला. महिलांची एकजूट, युवकांचा उत्साह आणि बालगोपाळांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. एकीचे बळ हातात हात घालून उभे राहिले, तर गावाच्या विकासाची वाट नक्कीच सुकर होते, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गांधी-शास्त्री जयंतीच्या निमित्ताने झालेल्या या श्रमदानाने ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ ही संकल्पना केवळ घोषणेत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवली असून, हा उपक्रम गावासाठी निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरला आहे.