अनिल चव्हाण (/प्रतिनिधी), जाफ्राबाद
शनिवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री टेंभुर्णी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुकानांना लक्ष्य करीत चोरीचा प्रयत्न केला. जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे मध्यरात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या शेतात कामाला आलेल्या मजुरांचे जेवणाचे डबे चोरीला गेल्याची घटना घडली असतानाच, शहरातील मुख्य बाजारपेठेत दोन प्रतिष्ठित दुकाने फोडून चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या वेळी गणेश नंदलाल काबरा यांच्या कापड दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील कापडांच्या गट्ठयांची उचकापाचक करून काही साहित्य चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याशेजारी अरलेल्या बिकानेर मिठाई दुकानाच्याही शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकानातील मिठाईचे बॉक्स व रोकड ठेवलेल्या गल्ल्याला चोरट्यांनी हात घातला असून काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेले गुलाब डाहके यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडलेले दिसताच त्यांनी तातडीने शेजारी असलेल्या बिकानेर मिठाई दुकानाकडे धाव घेतली. तेथेही शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब टेंभुर्णी पोलीस स्टेशनला माहिती दिली.
माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पो. कॉ. खरात व पो.कॉ. शिवरकर हे आपल्या पथकासह घटनास्थाळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही दुकानांची पाहणी करून पंचनामा केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पोलीस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून टेंभुर्णी व परिसरात चोरीच्या घटना वाडल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. व्यापाप्यांनी रात्रीच्या वेळी सुरक्षेची काळजी घेण्याची व पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
तपास सुरू | नागरिकांनी सतर्क राहावे





Social Plugin