बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथील विद्यार्थिनी कु. वैष्णवी हणमंत घनवट हिने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इचलकरंजी येथे होणाऱ्या आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ही सातारा विभागीय बॉक्सिंग स्पर्धा आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे आयोजन शाहू स्टेडियम, सातारा येथे करण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये कु. वैष्णवी घनवट हिने आत्मविश्वासपूर्ण आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळविले.
वैष्णवीच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिची पुढील आंतरविभागीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून, तिच्याकडून पुढील स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. कु. वैष्णवी घनवट हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डॉ. संजय क्षीरसागर, सर्व विभागप्रमुख, जिमखाना विभागप्रमुख प्रा. गौरव जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून आंतरविभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वैष्णवीच्या या यशामागे प्रा. गौरव जाधव तसेच माजी खेळाडू अरुण मदने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि वैष्णवीच्या मेहनत, सातत्य व जिद्दीमुळे तिने हे यश संपादन केले. महाविद्यालयाच्या वतीने वैष्णवी घनवट हिचे अभिनंदन करण्यात आले असून, इचलकरंजी येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेतही तिने उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.





Social Plugin