Ticker

6/recent/ticker-posts

महिला सक्षमीकरण, संविधान, आरक्षण आणि महागाईच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा;






“नारीशक्ती हीच परिवर्तनाची ताकद”  - खा. सुप्रिया सुळे कांबा येथे हजारो महिलांचा एल्गार; सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा उत्साहात

कांबा, कल्याण (ठाणे)| प्रतिनिधी : प्रफुल्ल शेवाळे 

कांबा, कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला मेळाव्याला हजारो महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत नारीशक्तीचा दमदार हुंकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, महिला आरक्षण, संविधानाचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांना हात घातला. “आज हजारो महिला या मेळाव्यात आल्या आहेत. तुमच्या हातातील मोबाईल केवळ माहेरी-सासरी बोलण्यासाठी नाही, तर आपल्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठीही वापरला पाहिजे,” असे सांगत त्यांनी महिलांना सामाजिक आणि राजकीय सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

महागाई, बेरोजगारीवर सुळे यांचा घणाघात

मच्छी, तेल, दूध यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी महागाईवर सरकारला धारेवर धरले. काळा पैसा बंद करण्याच्या घोषणा, नोटबंदी आणि त्यानंतर सामान्य नागरिकांना आलेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.

“आगामी काळात आमचे सरकार आले तर तुमचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणताही कर लावला जाणार नाही. नागरिकांच्या हाताला काम देणे आणि बेरोजगारी कमी करणे हे आमचे प्राधान्य असेल,” असे त्या म्हणाल्या.

‘लाडकी बहीण’ योजनेवरही त्यांनी टीका केली. “आज अनेक लाडक्या बहिणींचे पैसे कापले जात आहेत. मतांची गरज संपली की पैसे देण्याचे धोरण बदलते. आम्ही अशा फसव्या योजना देणार नाही,” असा आरोप त्यांनी केला.

“देश संविधानावर चालतो, कुणा एकाच्या मर्जीने नाही”

निवडणूक प्रक्रिया आणि संविधानाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

“आमचं घर फोडलं, पक्ष फोडला; पण हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, कुणा एकाच्या मर्जीने नाही,” असे त्या म्हणाल्या. निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, अशी मागणी करत त्यांनी मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली.

महिला आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. महिला आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर त्याची लोकसभा आणि विधानसभांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगत २०२९ पर्यंत महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

“आज अनेक महिलांनी संघर्ष केला, त्याग केला आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांना त्यांचा मान, सन्मान आणि स्वाभिमान परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांचा दुष्काळ, संविधान आणि महिला अधिकारांवर प्रहार

पक्षाचे मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुष्काळ, संविधान बचाव, महिला अधिकार आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला लक्ष्य केले. महिलांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा

पक्षाचे मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणातून दुष्काळ, संविधान बचाव, महिला अधिकार आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. महिला शक्तीला संघटित करून सामाजिक आणि राजकीय लढ्याला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत गोंधळे यांच्याकडे पाहत आव्हाड यांनी गंभीर शैलीत, “भरत भाऊ,सारखा प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष सोडून जातो तेव्हाकाळजाला जखमा होतात. मी स्वतः भरत ला सांगितलं होते की जाऊ नको. पण वेळ होती, वेळ गेली आता आमचा भरत परत माघारी आला आहे आणि त्यांच्या येण्याने पक्षाला ठाणे जिल्हा ग्रामीण ला एक नव संजीवनी जरूर भेटेल असा आत्मविश्वास आ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

“ठाणे पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला पाहिजे”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्याचे आवाहन केले.

“नारीशक्तीमध्ये राज्यातील आणि देशातील राजकारण बदलण्याची ताकद आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या सत्तेची समीकरणे जुळली; मात्र आता परिस्थिती बदलली आहे,” असे ते म्हणाले.

राज्यातील कोरडा दुष्काळ, पाणीपुरवठ्याचा तुटवडा आणि दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. “नारीशक्तीने आपली ताकद दाखवावी. या लढ्याची सुरुवात भरत गोंधळे यांनी केली आहे. अब अपनी बारी आयेगी!” असा जोशपूर्ण संदेश शशिकांत शिंदे यांनी दिला.

“पदासाठी नाही, संघटना मजबूत करण्यासाठी काम” – भरत गोंधळे

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भरत गोंधळे यांनी प्रास्ताविकातून खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. “पदासाठी काम करणारा मी कार्यकर्ता नाही. सरकारे येतात आणि जातात; मात्र आपले संघटन मजबूत आणि एकजूट राहिले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

महिला मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना आयोजक भरत गोंधळे यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांची उपस्थिती

या महिला मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून महेश तपासे – प्रभारी, कल्याण लोकसभा, ज्येष्ठ नेत्या विद्या वेखंडे, डॉ. रुपाली कराळे – महिला जिल्हाध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण, सोमनाथ मिरकुटे – कल्याण तालुका अध्यक्ष, विनायक पवार, कमलाकर टावरे, वंडार पाटील – कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष, नंदू मोगरे – शहापूर अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

तर कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून रविंद्र परटोळे, निलेश कडु, अनंता ठाकरे, सागर राठोड, ज्योती वाघमारे, आम्रपाली लोखंडे आणि संतोष म्हस्कर यांनी विशेष भूमिका बजावली.

महिला मेळाव्याला मोठी गर्दी असल्याने कल्याण तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला.

कांब्यातून नारीशक्तीचा राजकीय संदेश

महिला सक्षमीकरणासोबतच महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, आरक्षण, संविधान आणि निवडणूक पारदर्शकता यांसारख्या ज्वलंत विषयांवर झालेल्या जोरदार भाषणांमुळे कांबा येथील महिला मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. हजारो महिलांची उपस्थिती, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नेत्यांच्या आक्रमक भाषणांमुळे “नारीशक्तीच्या माध्यमातून राजकीय परिवर्तनाची नवी सुरुवात” असा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.