छायाचित्र - पुसेगाव - हिंदी दिन कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रोफेसर डॉ.सविता मेनकुदळे त्यावेळी विचार मंचावर डॉ. आर पी. भोसले, डॉ. संजय क्षीरसागर, प्रा. मुल्ला आर. के., प्रा. लालासाहेब पवार, डॉ.हनुमंत निमसे, प्रा. आवळे एम. एन. इत्यादी छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतींना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हिंदी भाषा करत असून, राष्ट्रीय एकात्मतेच्या जडणघडणीत हिंदीचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथील हिंदी विभाग व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. राजेंद्र भोसले होते.
‘हिंदी भाषा व राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मेनकुदळे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिंदी भाषेने बजावलेल्या भूमिकेचा आढावा घेतला. विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतींमधील लोकांना परस्परांशी जोडण्याचे कार्य हिंदीने केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय एकात्मता ही केवळ भाषेपुरती मर्यादित नसून ती आपल्या भाषा, विचार आणि कृतीतून प्रकट होत असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हिंदी भाषेचा इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भारतीय समाजजीवनातील योगदान याविषयी सविस्तर विवेचन केले. हिंदी भाषेची व्यापकता, सहजता आणि विविध भारतीय भाषांशी असलेले तिचे नाते यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रभावीपणे करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मुल्ला आर. के. यांनी केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ. संजय क्षीरसागर व अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक लालासाहेब पवार यांची विशेष उपस्थिती होती. अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रा. आवळे एम. एन. यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin